- यंदा आकाश चिन्ह व परवाना विभागाची रेकॉर्डब्रेक कमाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या वतीने २०२३-२४ या आर्थिक वर्षांत नवीन होर्डिंगला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून महापालिका नवीन होर्डिंगसाठी परवानगी देत नव्हती. या विभागाच्या उत्पन्नात दरवर्षी वाढ होताना दिसून येत आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच या विभागाला १७ कोटी २४ लाखांचे उत्पन्न मिळविण्यात यश आले आहे. यामध्ये चालू मागणी ९ कोटी २४ लाख तर ८ कोटी हे थकीत वसूल करण्यात आले आहेत, अशी माहिती आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी दिली.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत शहरातील विविध भागात होर्डिंग लावण्यासाठी परवानगी दिली जाते. शहरात सद्यस्थितीत २ हजार १०४ मोठे होर्डिंग अधिकृत आहे. परवानाधारक फलकांच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत उत्पन्न जमा होत आहे. आकाश चिन्ह विभागाचे गेल्या पाच वर्षांत उत्पन्नात घसघशीत वाढ झाली आहे. यामध्ये २०१७-१८ मध्ये ३ कोटी ७९ लाख, २०१८-१९ मध्ये ३ कोटी ९८ लाख, २०१९-२० मध्ये ६ कोटी ११ लाख, २०२०- २१ मध्ये ४ कोटी २० लाख तर २०२१-२२ मध्ये १२ कोटी ६६ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. करोनाच्या महामारीमध्ये उत्पन्नात घट झाली होती. मात्र, २०२१-२२ आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षांत आकाश चिन्ह विभागाला १७ कोटी २४ लाख ४४ हजार ६३१ असे उत्पन्न मिळाले आहे. शहराच्या विविध भागातील ४३३ होर्डिंगचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. या होर्डिंगधारकांकडे तब्बल ९ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल झाली असती तर उत्पन्नात मोठी वाढ झाली असते. मात्र, या होर्डिंगधारकांकडील वसुलीसाठी न्यायालयाला विनंती करणार असल्याचे उपायुक्त सचिन ढोले यांनी सांगितले.
शहराच्या सौदर्यात बाधा न येता जाहिरात फलक उभारणे आणि उत्पन्न वाढीसाठी आकाश चिन्ह विभागाच्या वतीने चालू आर्थिक वर्षांत काळात विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी नवीन होर्डिंग उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे. बीआरटी रस्ते, मेट्रो पिलर, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते दुभाजकांमध्ये किऑस्क उभारणे, महापालिकेच्या ५० जागेवर होर्डिंग उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उत्पन्नात चांगली होईल, असा होरा महापालिका प्रशासनाचा आहे.
आकाश चिन्ह व परवाना विभागात उत्पन्न वाढीसाठी जुनी थकबाकी वसुल करण्यास प्राधान्य दिले. शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षण केले. काही होर्डिंग पालिकेच्या रेकॉर्डवर नव्हते, अशांची नोंद करून वसुली केली. २०२२-२३ या आर्थिक वर्षांत आत्तापर्यंतचे सर्वाधिक असे १७ कोटी २४ लाख रूपये वसुल झाले आहेत.
– सचिन ढोले, उपायुक्त, आकाश चिन्ह व परवाना विभाग…












