न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२३) :- शहरातील चिखली पोलिस ठाण्यासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी पूर्णानगर चिखली येथील मध्यवर्ती सेवा केंद्रातील ९०० चौरस मीटर जागा संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी २३ लाख ९५ हजार २५० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये चिखली पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात आले. तेव्हापासून हे पोलिस ठाणे भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू आहे.
पोलिस ठाण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पूर्णानगर येथील चिखली मध्यवर्ती सुविधा केंद्रात नऊ गुंठे जागा आरक्षित करण्यात आली होती. तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मध्यवतीं सुविधा केंद्रातील या जागेच्या संपादनासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करण्यात आला आहे.