न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२३) :- पुणे महापालिकेच्या मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाकड ते सांगवी पूल या ८.८० किलोमीटर अंतराच्या एका बाजूच्या कामासाठी २७६ कोटी ५४ लाख ३१ हजार ३७८ खर्च अपेक्षित आहे. हे काम १४.२५ टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कंपनीस देण्यात आले आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता मंगळवारी (दि. २५) दिली आहे.
शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. त्यातील पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना पालिका राबवित आहे. मुळा नदीचा प्रकल्प पुणे पालिका राबवित असून, त्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका निधी देणार होती. पहिल्या टप्प्यातील कामासाठी पालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने ३२० कोटी ८५ लाख ४८ हजार ७८५ खर्चाची निविदा स्वतंत्र निविदा १८ नोव्हेंबर २०२२ ला प्रसिद्ध केली. त्यासाठी चार विविध कंपन्यांनी निविदा भरल्या.
बी. जी. शिर्केने १४.२५ टक्के कमी दराने, न्याती इंजिनिअरींगर्सने ०.४० टक्के कमी दराने आणि जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टने ०.००१ टक्के कमी दराने निविदा भरली. अजवानी इन्फ्रास्ट्रक्चरची निविदा अपात्र ठरली. सर्वात कमी दराची शिर्के कंपनीची निविदा पात्र ठरली. दहा टक्केपेक्षा अधिक दर कमी असल्याने शिर्के कंपनीकडून १७ कोटी ५० लाख रूपयांची अतिरिक्त सुरक्षा रक्कम ५ जानेवारी २०२३ ला जमा करून घेण्यात आली आहे. या कामाच्या खर्चास आयुक्त सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
















