न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२३) :- शहरातील गुन्हेगारीचा सफाया करणाऱ्या पोलिसांसाठीही ‘स्वच्छ’ कार्यालय उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ३७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यातून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय ‘चकाचक’ राहण्यास मदत होणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित करण्यात आले. मात्र, पुरेशी साधनसामग्री तसेच आवश्यक मनुष्यबळ अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे आयुक्तालयावर मोठा ताण असून, पोलिसांना कसरत करावी लागत आहे. यात आयुक्तालयासाठी व आयुक्तालयांतर्गत असलेले १८ पोलिस ठाणे, विविध विभाग व शाखा यासाठी सफाई कामगार उपलब्ध व्हावेत, अशी मागणी करण्यात येत होती. त्याबाबत आयुक्तालय प्रशासनाकडून वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी प्रस्ताव सादर करण्यात येत होता.
राज्य शासनाच्या गृहविभागाकडून १७ एप्रिल २०२३ रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी ३७ सफाई कामगार नियुक्त करण्यास मान्यता मिळाली आहे. बाह्य यंत्रणेद्वारे ही नियुक्ती होणार असून, सफाई साहित्याच्या ७९ लाख ८१ हजार ७८८ रुपये खर्चासह मंजुरी देण्यात आली आहे. शासनाने मंजुरी दिल्यानुसार पोलिस आयुक्तालयासाठी कंत्राटी पद्धतीने ३७ सफाई कामगारांची नियुक्ती होणार आहे. शासनाच्या जिल्हा पोलिस दलाच्या लेखाशीर्षामधून २०२३-२४ या वर्षाच्या मंजूर अनुदानातून हा खर्च भागविण्यात यावा, असे शासनाच्या आदेशात नमूद आहे.
पोलिस ठाण्यांसह चौक्यांसाठीदेखील सफाई कामगारांची नियुक्ती होणार आहे. मात्र, सध्या आयुक्तालयांतर्गत असलेल्या पोलिस चौक्यांमध्ये गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत. त्यामुळे चौक्यांमध्ये तक्रारदार व नागरिक जात नाहीत. परिणामी पोलिसांकडूनही या चौक्यांचा वापर काही प्रमाणात कमी झाला आहे.