न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च) :- एकमेकांना उत्साहात रंग लावत, शुभेच्छा देत गाण्यांच्या तालावर रंग खेळण्यात बेधुंद होत खराबवाडीतील सारा सिटी फेज डी सहकारी गृहनिर्माण सोसायटीत होळी व धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. दरम्यान, सर्वांनी एकीने राहण्याची प्रतिज्ञा घेत होळी साजरी करण्यात आली.
लहान मुलांमध्ये एकमेकांना भिजविण्याची लागलेली स्पर्धा आणि आणि मोठ्यांनी स्वतःहून पाण्याचा गैरवापर टाळत अपूर्व उत्साहात धुलीवंदन साजरे केले. सर्वांना पाणी टंचाईचेही भान निश्चितच होते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून यंदा पाण्याचा वापर टाळत कोरड्या रंगांचीच होळी खेळली आणि हेच यंदाच्या धुलीवंदनाचे वैशिष्ट्यही ठरले.
या रंगोत्सवात लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुष सहभागी झाले होते. दरम्यान, होळीही एकत्रितच साजरी करण्यात आली. होळीचे पूजन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश कड यांच्या हस्ते करून, होळी पेटविण्यात आली. होळीची सर्व महिलांनी पूजा करीत द्वेष, मद, मत्सर जाऊ दे आणि सर्वांनी एकीने, आनंदाने राहण्याची प्रतिज्ञा करण्यात आली.















