न्युज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २१ मार्च) :- श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथे ग्रामस्थांच्या वतीने ‘एक गाव एक शिवजयंती’ या शिवजयंती महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. याही वर्षी मोठ्या थाटात व पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. तसेच शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
यानिमित्त शुक्रवार (दि. २२) रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत चिखलीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री गणेश मंदिर परिसरात ओम ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्यातून भव्य रक्तदान, मोफत नेत्र तपासणी, मोफत दंत चिकीत्सा, मोफत लहान मुलांची आरोग्य तपासणी, मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ८ ते १० या वेळेत श्री संतकृपा भजनी मंडळ, चिखली यांचा हरिभजनाच कार्यक्रमही होणार आहे.
शनिवार (दि. २३) रोजी सकाळी ९.०० वाजता शिवज्योत व शिवपुतळा यांचे पूजन होणार आहे. सकाळी १०. ०० वाजता समस्त शिवप्रेमींच्या वतीने भव्य दुचाकी रॅली, सायंकाळी ठिक ५.०० वाजता भव्य पारंपारिक श्री शिवरायांची पालखी मिरवणूक होणार आहे. या मिरवणूकीस पवारवस्ती, कुदळवाडी, चिखलीतून सुरवात होऊन, चिखलीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता होणार आहे.
या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे श्री शिवरायांची भव्य मुर्ती व आकर्षक सेट (२५ फूट उंच सेट), विषेश आकर्षक असे तोफेतून फुटणारे कागदी बार, अमर जवान रथ, पुष्प वृष्टी. तसेच नामवंत पथकांचा समावेश ज्यात श्री हनुमान व्यायाम मंडळ ढोलपथक चिखली गावठाण, मल्हार ढोलपथक (घरकुल), वीर ढोलपथक (भोसरी), श्री दादा महाराज नाटेकर आश्रम ध्वज पथक चिखली असणार आहे, अशी माहिती आयोजक समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखली, सहभागी गावातील सर्व मंडळे, सामाजिक संस्था, सोसायटी, महिला बचत गट व एक गाव एक शिवजयंती उत्सव समिती यांनी दिली आहे.











