- अमली पदार्थांच्या तस्करीचीही शक्यता?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- कुदळवाडीतून पर-राज्यात दैनंदिन प्रवाशांची अमानवी पध्दतीने व क्षमतेच्या दुप्पट वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकांविरूध्द पिंपरी चिंचवड परिवर्तन वाहतुक विकास आघाडीने एल्गार पुकारला आहे. बेजबाबदार ट्रॅव्हल्सविरूध्द कारवाईची मागणी आघाडीचे शहराध्यक्ष अमित मोहिते यांनी पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन विभागाचे मुख्य अधिकारी अतुल आदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड परिवर्तन आघाडीचे गोपाल कच्छवे, इम्तियाज सिद्दीकी उपस्थित होते.

चिखली कुदळवाडी परिसर हा शहरातील सर्वात मोठा परप्रांतीय कामगारांच्या रोजगारांचा केंद्रबिंदु आहे. याठिकाणी उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश व अन्य राज्यातील कामगार तात्पुरत्या स्वरुपात रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक झालेले आहेत. येथील वाहन व्यावसायिक क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवासी गाडीत कोंबून प्रवाशांना नरक यातना देत आहेत. ही वाहतुक अतिशय अमानवी पध्दतीची असून कामगारांच्या आरोग्याची हेळसांड अनं जीवावर बेतत आहे. यामुळे या अमानवी वाहतुकीवर तात्काळ कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
कुदळवाडीतील ही वाहतूक अवैध आणि अमानवी आहे. शारिरीक अंतर राखले जात नाही. यामुळे संसर्गजन्य आजाराचा धोका वाढत आहे. अमली पदार्थाचीसुध्दा वाहतुक केली जात असावी, असा आम्हाला दाट संशय आहे. – अमित मोहिते, शहर अध्यक्ष – पिंपरी चिंचवड परिवर्तन वाहतुक विकास आघाडी…


















