- भारत सरकारच्या केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड..
- विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन… !
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध दंत चिकित्सक तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड धारक डॉ. आदित्य पतकराव यांची नुकतीच भारत सरकारच्या केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. भारत सरकारच्या संचार मंत्रालयाचे विभाग अधिकारी एस. के घोष यांनी (दि. २) रोजी त्यांच्या निवडीबाबतचे आदेश काढले आहेत.
डॉ. आदित्य पतकराव यांनी या निवडीबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांचे आभार व्यक्त केले आहेत.
आपल्या देशात आजही ४ जी आणि ५ जी सुविधा म्हणावी तितक्या स्पीडने चालत नाहीत. तसेच बऱ्याच ठिकाणी नेटवर्क पोहचत नसल्यामुळे संपर्क गतिमान होत नाही. यासारख्या अनेक प्रश्नावर भविष्यात उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. आदित्य पतकराव यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.
दरम्यान या निवडीबद्दल डॉ. आदित्य पतकराव यांना विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. आदित्य यांच्या निवडीमुळे नक्कीच पुणे आणि पिंपरी चिंचवडवासीयांना येणाऱ्या काळात इंटरनेट आणि नेटवर्क सेवा अधिक गतीमान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉ. आदित्य पतकराव यांचा परिचय…
डॉ. आदित्य दगडू पतकराव हे मूळचे अंबाजोगाई (बीड) येथील रहिवासी असून त्यांनी शासकीय महाविद्यालयातुन बीडीएस ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असून पिंपळे गुरव येथील अद्ययावत अशा आदित्य ऍडव्हान्स डेंटल हॉस्पिटलचे ते संचालक आहेत. डॉ. आदित्य पतकराव यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.















