न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड पिंपरी- चिंचवड महापालिकेत लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे. देहूरोडचा समावेश झाल्यास क्षेत्र व लोकसंख्या किती होईल, याचा सविस्तर तपशील अभिप्रायासह महापालिकेच्या नगररचना विभागाने तयार केला आहे. सकारात्मक अभिप्राय असल्याने देहूरोडचा महापालिकेत समावेश होऊ शकेल. देहूरोडचा समावेश झाल्यास महापालिकेची हद्द वाढणार असून प्रभाग रचनेत बदल होईल.
दरम्यान, अभिप्राय तयार असून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला आहे. सिंह यांची स्वाक्षरी होताच हा अभिप्राय राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिका क्षेत्रात समाविष्ट करावे का? त्याचे क्षेत्र, लोकसंख्या किती आहे. महापालिकेत समाविष्ट झाल्यास महापालिकेचे सुधारित क्षेत्र व लोकसंख्या किती होईल, याची सविस्तर माहिती राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेकडून तातडीने मागविली होती. त्याबाबत चार स्मरण पत्रे देखील महापालिकेला दिली होती. त्यानुसार महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी देहूरोडला जावू सविस्तर माहिती जमा केली आहे. त्याबाबतचा अभिप्राय तयार केला आहे. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे.
काय आहे अभिप्राय?
देहूरोडमध्ये रेडझोन बाधित क्षेत्रामुळे विकासाला कोणतीही संधी नाही. देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचे कोण भागविणार, केंद्र शासनाने वार्षिक ५० कोटी रुपये दिल्यास महापालिकेत घेण्यास काही हरकत नाही. त्यामुळे देखभाल करण्याचे सोपे होईल. तसेच क्रीडांगणे, सभागृह, जाहिरात फलकाच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येईल, असा दोन्ही बाजूंचा विचार करत नगररचना विभागाने सकारात्मक अभिप्राय तयार केला आहे.


















