- निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी भाकरी फिरविण्याच्या तयारीत?..
- प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया बोलकी; हे आहेत पदासाठी इच्छुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर पिंपरी-चिंचवड शहरातील तिघांची वर्णी लागली आहे. प्रदेश कार्यकारिणी जाहीर करताच शहराध्यक्ष पदाचीही चर्चा शहरामध्ये सुरू झाली आहे. त्यासाठी शहरातील अनेक दिग्गजांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आगामी स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून नवीन कारभारी निवडीची शक्यता आहे.
एका बाजूला राष्ट्रवादीतील घडामोडी सुरू असताना राज्यात भाजपाकडून संघटनात्मक पुनर्बांधणी करण्यात येत आहे. त्याची सुरुवात प्रदेश कार्यकारिणी निवडीपासून करण्यात आली आहे. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख महानगरातील शहराध्यक्ष निवडी होणार आहेत. गेल्या तीन वर्षांत शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभागप्रमुखांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांचे राजीनामे घेतले जात आहेत. पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचाही कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे शहराचा नवीन अध्यक्ष कोण होणार की, लांडगे यांनाच पुन्हा संधी मिळणार, कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.
शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने भाजपमधील काही निष्ठावंत व पक्षांतर करून आलेल्या माजी नगरसेवकांनीही पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, शंकर जगताप, माऊली थोरात, अमोल थोरात, विलास मडेगिरी, अनुप मोरे यांच्या नावाचीही शहराध्यक्षपदासाठी चर्चा आहे.
दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना भाजपाची उमेदवारी मिळाली. पोटनिवडणुकीमध्ये जगताप पॅटर्न’मुळे निवडणूक जिंकली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली. त्यामुळे शंकर जगताप यांना शहराध्यक्षपदी ताकद देऊन भाजपा पक्षश्रेष्ठी आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करणार असल्याचे भाजप गोटात चर्चा आहे.
पिपरी- चिचवडचा शहराध्यक्ष आणि राज्यातील ७५ जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी पक्षाचे निरीक्षक संबंधित शहर, जिल्ह्यांमध्ये जात आहेत. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निरीक्षक वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार. त्यानंतर शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय होईल. – मा. चंद्रशेखर बावनकुळे – प्रदेशाध्यक्ष, भाजपा…
















