न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित सर्व दस्तऐवज अर्थात अभिलेखे अद्ययावत केले जाणार आहेत. त्यासाठी झिरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल कार्यपद्धती राबविण्यात येणार आहे. त्याचा आढावा दरमहा घेतला जाणार आहे. त्याबाबतचा आदेश प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांना दिला आहे.
उद्यान, पशू करसंकलन विभागाचे विभागीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये व महापालिका दवाखाने व रुग्णालये वेगवेगळ्या भागात आहेत. या सर्व कार्यालयातील अभिलेखे अद्ययावत केले जाणार आहेत. त्यासाठी सर्व अभिलेखांचे कायमस्वरूपी स्कॅनिंग व डिजिटलायझेशन केले जाणार आहे. त्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाला सूचना देण्यात आली आहे. मात्र, अभिलेखे करण्यासाठी विभागप्रमुखांसह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे सर्व विभागांच्या कामकाजाचा मासिक आढावा घ्यावा, अभिलेखांचे वर्गीकरण व अद्ययावतीकरण करून अहवाल सादर करावा. सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील अभिलेखे सहा गठ्ठे पद्धतीने ठेवावेत, असे आदेशात म्हटले आहे.


















