- ‘पीएमपी’चा देखील आता डिजिटल व्यवहारांवर भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरात सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणारी पीएमपीएमएल संस्था आता डीजीटल होण्याच्या मार्गावर आहे. प्रवासादरम्यान तिकिटासाठी आता प्रवाशांचा खिशात पैसे ठेवण्याचा प्रश्न मिटला आहे. काही दिवसांतच पीएमपीएमएल च्या सर्व बसेसना क्युआर कोड बसविला जाणार आहे. आज बुधवारच्या मिटींगनंतर क्युआर कोड सेवेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वरिष्ठांनी दिली.
शहरातील नागरिक आता खिशात कॅश बाळगण्याऐवजी सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात करण्यावर भर देत आहेत. वेगवेगळ्या ऑनलाईन अॅपद्वारे डिजिटल व्यवहार होत आहेत. महापालिका, बँका, सरकारी कार्यालये तसेच आता किराणा दुकान, भाजी मंडई, हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या मोठ्या पान स्टॉलवर देखील डिजिटल स्वरूपात व्यवहार होत आहेत.
वाहतूक सेवेतील रेल्वे आणि विमान सेवेसह आता एसटीही डिजिटल स्वरूपात व्यवहार सुरू करण्याच्या वाटेवर असताना पीएमपी कशी थांबणार. त्यामुळे पीएमपी देखील आता डिजिटल व्यवहार सुरू करणार असून, प्रत्येक बसमध्ये क्युआर कोड बसविला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा खिशात पैसे ठेवण्याचा त्रास वाचणार आहे आणि कोड स्कॅन करून तिकीटाचे पैसे भरता येणार आहेत.
सुरूवातीस चाचणी स्वरूपात काही बसेसला हा कोड बसविण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी- चिंचवडसह पीएमपीच्या १५ आगारामधील प्रत्यक्ष मार्गावरील १६१९ बसना क्युआर कोड लावला जाणार आहे. दररोज पीएमपीने प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील एकुण ११७००९६ प्रवाशांचा सुटे पैसे जवळ बाळगण्याचा ताप आता दूर होणार आहे.
पीएमपीएमएलची सेवा “आता डिजिटल स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (दि. १७) याबाबत मिटींगचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर क्युआर कोड प्रणाली सुरू करणार आहोत. सुरूवातीस तात्पुरत्या स्वरूपात दोन बसमध्ये कोड लावला जाणार आहे. यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहता सर्वच बसेसला हि प्रणाली सुरू केली जाणार आहे.
– ओम प्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक, पीएमपीएमएल पुणे…