न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- मोरवाडी पिंपरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे आज बुधवारी (दि. १७) नेहरूनगरमधील नव्या इमारतीमध्ये स्थलांतर होत आहे. इमारतीमध्ये वरिष्ठ दिवाणी व सत्र न्यायालय सुरू करावे, या मागणीसाठी वरिष्ठ दिवाणी नायायालय व सेशन कोर्ट वकील कृती समितीच्या वतीने चक्री उपोषण सुरू केले आहे.
मोरवाडी पिंपरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात सोळाशे वकील आहेत. शहराची लोकसंख्या अंदाजे तीस लाख आहे. तसेच शहरातील खटल्यांचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. शहरात दरवर्षी अंदाजे तीन हजार ते साडेतीन हजार गुन्हे दाखल होतात. प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायालय व सेशन्स कोर्टातील कामकाजासाठी वकील, पक्षकार व पोलीस यांना शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अनेक वर्षांपासून जावे लागत आहे. पिंपरी न्यायालयातील वकिलांची वरिष्ठ दिवाणी न्यायालय व सेशन कोर्टची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नेहरूनगर येथील नियोजित इमारतीमध्ये एकूण ११ न्यायालय तयार आहेत. तरी देखील पिंपरी येथे कामकाज करणाऱ्या वकिलांची वरिष्ठ दिवाणी न्यायालय व सेशन कोर्टाची मागणी मान्य झालेली नाही.
म्हणून मोरवाडी पिंपरी येथील न्यायालयात कामकाज करणाऱ्या वकिलांनी तसेच वरिष्ठ दिवाणी न्यायालय व सेशन कोर्ट वकील कृती समिती यांनी वरिष्ठ दिवाणी न्यायालय व सत्र न्यायालय मिळण्याकरिता चक्री उपोषण सुरू केले आहे. याला अॅड. राजू माधवन, अॅड. सुशील मंचरकर, अॅड. अतुल कांबळे, अॅड. दत्ता झुळूक, अॅड. संगीता परब, अॅड. सारिका परदेशी हे वकील चक्री उपोषणात सहभागी झाले आहेत. वकील उपोषणस्थळी भेट देत, स्वाक्षरीच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवित आहेत.