न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध विभागात वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या वर्ग एक ते वर्ग चार मधील अधिकारी कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्यात यावी. यामध्ये विशेषता करसंकलन, लेखा, भांडार, स्थापत्य, आरोग्य, वैद्यकीय, आकाशचिन्ह, पर्यावरण या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागात बदल्या होणे अपेक्षित आहे.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी एकाच विभागात ६ वर्षांपासून अधिक काळ असलेल्याची माहिती मागविली होती. त्या अधिकारी, कर्मचा-याची प्रशासन विभागास प्राप्त झालेली आहे.
प्रशासनाने कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक, सहायक भांडारपाल, लेखापाल, उपलेखापाल या सारख्या पदांवर अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचारी आढळून येत आहेत. अनेक विभागात उपलेखापाल, मुख्य लिपिक, लिपिक, शिपाई, वाहन चालक 7 वर्षापासून ते १५ वर्षांपर्यंत एकाच विभागात कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक लिपिक निविदाप्रक्रिया व इतर महत्त्वाच्या जबाबदा-यांमुळे ठाण मांडून खुची सोडण्यास तयार नाहीत तर, २० वर्षांपासून एकाच शाळेत असणारे शिक्षक, १५ वर्षे एकाच रुग्णालयात असलेले वॉर्डबॉय, १० वर्षे एका विभागात असलेले अनेक शिपाई, २० वर्षे सफाई कामगार, १५ वर्षे आया असे कर्मचारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष काम करत असल्याचे आढळून आलेले आहे. त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या त्या-त्या विभागात न करता इतरत्र अन्य विभागात करायला हव्यात.
तसेच करसंकलनच्या १७ विभाग कार्यालयातील मुख्य लिपिक, लिपिकांच्या तातडीने अन्य विभागात बदल्या कराव्यात. त्या-त्या झोनच्या कर्मचाऱ्या विरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग एक ते वर्ग चार मधील अधिकारी-कर्मचा-यांनी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्यांची तातडीने बदल्या कराव्यात. पुणे महापालिकेप्रमाणे एकाच विभागातील अधिकारी-कर्मचारी पुर्णपणे दुस-या विभागात बदल्या करण्यात याव्यात, याबाबत लक्ष घालून योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष संतोष शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.