- आकृतीबंधानुसार पदभरती केंव्हा होणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२३) :- देहू नगरपंचायतीची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली. नगरपंचायतीचा आकृतीबंध मंजूर झाला असला तरी पदभरती होत नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नगरपंचायतीच्या कामकाजावर विपरित परिणाम होत असून कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. देहूची लोकसंख्या जवळपास ५० हजारांवर पोहोचली आहे. नागरिकरणाचा वेग वाढला आहे. शिवाय भाविकांची बाराही महिने वर्दळ त्याचाच ताण नगरपंचायत प्रशासनावर येत आहे.
एकापेक्षा जास्त जबाबदारी सांभाळताना मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. देहूत सध्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवरच नगरपंचायतीचा कारभार सुरू आहे. त्याचा विकासकामांवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी मुख्याधिकारी जनतेच्या प्रलंबित समस्या आणि तक्रारींचा निपटारा करण्यावर स्वतः लक्ष देत आहेत.
आकृतीबंधानुसार पदभरती गरजेची…
दोन वर्षांपूर्वी देहू नगरपंचायतीची स्थापना झाली. तेव्हापासून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवरच सर्व कारभार सुरू आहे. सध्या कार्यरत मुख्याधिकाऱ्यांकडे विविध पदांचा अतिरिक्त भार आहे. प्रशासकीय कारभार हरकतीवरील सुनावण्या, शासकीय बैठका, यात्रा काळातील नियोजन आणि नागरिकांचे प्रश्न सोडविताना त्यांच्यावर मोठा ताण येत आहे. देहू नगरपंचायतीस ७ लिपिक, टंकलेखक १ गाळणी चालक- प्रयोगशाळा सहायक ऑपरेटर वीजतंत्र जोडारी १ तारतंत्री-वायरमन, ३ शिपाई, २ मुकादम, १ व्हन अशा १८ कर्मचाऱ्याची गरज आहे. सध्या देहू नगरपंचायतीकडे फक्त ६ कर्मचारी उपलब्ध आहेत. ८ अधिकारी आणि १२ कर्मचारी कमी असल्याने सध्या देहुनगर पंचायतीचे मुख्याधिकारी आणि बांधकाम विभाग अभियंता हे दोघेच देहुनगर पंचायतीचा गाडा ओढत आहेत. अपुऱ्या अधिकारी आणि कर्मचारी संख्येमुळे हा नगरपंचायतीचा डोलारा सांभाळताना मुख्याधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कामाच्या अतिरिक्त तणावामुळे अनेक कर्मचारी रक्तदाब, मधुमेहासारख्या आजाराने ग्रस्त आहेत. प्रभागांमधील विविध भागातील स्वच्छतेसाठी सफाई कर्मचान्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, काही भागात सफाई कर्मचाऱ्यांची संख्याच अपुरी आहे. त्यामुळे सांडपाणी वाहिन्यांची नियमित सफाई होत नाही. स्थापत्य, आरोग्य अशा विविध विभागांच्या कामावर परिणाम होत आहे. देहूचा विकास गतिमान होण्यासाठी पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने मिळणे गरजेचे आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, तुकाराम बीज, एकादशी किंवा अन्य यात्रा उत्सवाच्या नियोजन करताना नगरपंचायतीवर प्रचंड ताण येतो. पूर्वी ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषदेची यंत्रणा मदतीला असायची. मात्र, आता यात्रा उत्सवात नगरपंचायतीला सर्व नियोजन आणि व्यवस्था पाहावी लागते.












