- मा. आ. विलास लांडे यांच्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींकडून निर्णय होईना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२३) :- शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे झाली.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार,खासदार सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हे हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू होती. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात भावी खासदार आशयाचे फ्लेक्स लावले होते. त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
त्याच दरम्यान आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिरुर लोकसभा मतदार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला विद्यमान खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
या बैठकीनंतर शिरुर लोकसभा मतदार संघातून इच्छुक उमेदवार असलेले माजी आमदार विलास लांडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ” शिरुर लोकसभा मतदार संघातील आढावा शरद पवार यांनी जाणून घेतला. त्यावेळी अमोल कोल्हे यांना पुन्हा शिरुरमधून निवडणूक लढवावी लागेल , ” असे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना बैठकी बाबत विचारले असता ते म्हणाले की, लोकसभेत अमोल कोल्हे यांचं काम चांगलं असून त्यांना संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर मतदार संघातील विविध प्रकल्प मार्गी लावले आहेत. त्यातील प्रामुख्याने वाहतूक कोंडी आणि बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी लावला आहे. यामुळे नागरिकांमध्ये चांगल्या प्रकारे चर्चा असून आज झालेल्या बैठकीत अमोल कोल्हे यांच्या नावाला सर्वांनी मजबुतीने पाठिंबा दिला आहे. पण आमचा पक्ष इतर (ठाकरे गट शिवसेना आणि काँग्रेस) दोन पक्षांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेईल अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.


















