न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. ०७ जून २०२३) :- ‘रिड्युस, रियुज व रिसायकल (RRR) केंद्रांच्या’ उत्कृष्ट कामगिरीबद्दल (दि. ७) रोजी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते RRR केंद्रांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, स्वच्छ भारत अभियान कक्षाच्या समन्वयक सोनम देशमुख आदी उपस्थित होते.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडील निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ‘मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर’ या अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे ३२ ‘रिड्युस, रियुज व रिसायकल (RRR) केंद्र’ दिनांक २० मे ते ५ जून या कालामधीमध्ये स्थापन करण्यात आले होते. या केंद्रांवर नागरिकांनी आपल्या घरातील निरुपयोगी वस्तू/साहित्य (जसे की जुने कपडे, जुनी पुस्तके, जुने खेळणे, जुने चप्पल-बुट, इलेक्ट्रॉनिक वस्तू इ.) जमा करणे अपेक्षित होते. या उपक्रमाचा उद्देश निरुपयोगी वस्तूंचा पुनर्वापर तसेच पुनर्चक्रीकरण करणे हा आहे. दिनांक २० मे ते ५ जून या कालामधीमध्ये सदर केंद्रांवर अंदाजे ४० हजारांवर नागरिकांनी सहभाग नोंदवून जवळपास ७७.३८ टन इतके साहित्य जमा झाले.
या केंद्रांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल Best State–of–the–Art RRR center, Best Performing RRR Center आणि Best Performing Zone या तीन वर्गांमध्ये पारितोषिक वितरण करण्यात आले. Best State–of–the–Art RRR center या वर्गामध्ये प्रभाग २ ला प्रथम पारितोषिक, प्रभाग २१ ला द्वितीय पारितोषिक आणि प्रभाग १० ला तृतीय पारितोषिक देण्यात आले. Best Performing RRR Center या वर्गामध्ये प्रभाग ११ ला प्रथम पारितोषिक, प्रभाग १७ ला द्वितीय पारितोषिक आणि प्रभाग १६ ला तृतीय पारितोषिक देण्यात आले. तर Best Performing Zone या वर्गामध्ये ब क्षेत्रीय कार्यालयास प्रथम पारितोषिक, ड क्षेत्रीय कार्यालयास द्वितीय पारितोषिक आणि अ क्षेत्रीय कार्यालयास तृतीय पारितोषिक देण्यात आले. त्याचप्रमाणे या उपक्रमामध्ये मोलाचे योगदान दिलेबद्दल SWaCH Plus सेवा सहकारी संस्था मर्यादित या स्वयंसेवी संस्थेस मा.आयुक्त शेखर सिंह यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
‘रिड्युस, रियुज व रिसायकल (RRR) केंद्रांच्या’ उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयुक्त शेखर सिंह यांनी विजेत्यांचे कौतुक केले. तसेच भविष्यात देखील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक RRR केंद्र कायमस्वरुपी स्थापन करण्यात यावे अशा सुचना यावेळी दिल्या.












