न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २५ मार्च) :- पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीमार्फत भोसरी एमआयडीसी भोर रबर प्रॉडक्ट्स येथे युवा-युवती मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील विविध भागातून तरुण व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर होते.
या वेळी युवा अध्यक्षा दुर्गा भोर यांनी मेळाव्यात बेरोजगारी स्टार्टअप मुद्रा लोन याविषयी चर्चा केली. त्या म्हणाल्या की ”देशात महिला सक्षमीकरण फक्त कागदोपत्रीच आहे, खऱ्या अर्थाने तळागाळातल्या झोपडपट्टी भागातल्या महिलांना व तरुणांना सक्षम होण्याची गरज आहे. पिंपरी विकास आघाडी तरुण तरुणींना यापुढे सामाजिक, व्यावसायिक व सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण करून देणार आहे. कारण तरुण-तरुणी देशात बदल घडवू शकतात. यावेळी तरुण-तरुणींचे गट करून, प्रत्येकाला नोकरी व्यवसायात स्थिर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, दुर्गा भोर यांनी सांगितले.
पिंपरी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर यांनी पिंपरी चिंचवड शहरात बाहेरील राज्यातील तरुण येऊन नोकरी करतात. परंतु, स्थानिक तरुणांना आतापर्यंत येथील कोणतीही कंपनी कामास घेण्यास टाळाटाळ करते. यावर लवकरच उपाययोजना करण्यात येईल. तसेच सरकारी पातळीवर कोणतीही मदत लागल्यास त्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करू. शहरातील बेरोजगार मुलांना व्यवसायात येण्याचे आवाहनही भोर यांनी यावेळी केले.
यावेळी युवती उपाध्यक्षा ऐश्वर्या थिटे, सतीश भांडेकर, दीपक म्हेत्रे, प्रतिमा बनसोडे, शांभवी रामपाल, चंद्रकला पवार, रजिया सय्यद, कांबळे, विद्यार्थी संघटनेचे प्रशांत पठारे व मोठ्या संख्येने विद्यार्थी युवा, युवती आदी उपस्थित होते.
















