समस्त पंचक्रोशीत सोळंकी परिवाराच्या कामाचे कौतुक
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च) :- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात भयंकर दुष्काळ पडला आहे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सगळे दृश्य पाहून राजुरीचे सुपूत्र व प्रसिद्ध उद्योगपती मनोज सोळंकी यांच्या पुढाकाराने राजुरी या गावी रमणकाका सोळंकी यांच्या हस्ते नुकतेच मोफत पाणीवाटप टँकरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राजुरीचे सरपंच डॉ. अमोल दुरंदे, बंडू शिंदे गुरुजी, पोलीस पाटील मुरलीधर चिंचकर, चेअरमन बबन साखरे, बापू साखरे, ज्ञानेश्वर साखरे, आबासाहेब टापरे, राजेंद्र भोसले, सोमनाथ शिंदे, बंडू शिंदे, नागेश गरुड, रामदास शिंदे, पिंटू लांडगे, बारकू गरुड, विठ्ठल फरांडे आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय सरपंच परिषदचे करमाळा तालुका अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे म्हणाले की, ”जे काम शासनाला करायला अवघड जाते. तेच काम मनोजशेठ यांनी आपल्या तालुक्यातील आपुलकीमुळे सुरु केले व पूर्णत्वासही नेले. त्यामुळे करमाळा तालुक्यातील या दुष्काळी गावांची पाण्याची समस्या कमी होणार आहे. समस्त पंचक्रोशीत सोळंकी परिवाराने केलेल्या या कामाचे कौतुक होत आहे.
मनोज सोळंकी म्हणाले की, ”दुष्काळामुळे संपूर्ण तालुका होरपळून निघत आहे. शेती सोडा परिसरातील नागरिकांना साधे पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. परिसरातील आया-बायांना, लेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी दृढ निश्चय करून, टँकरच्या सहाय्याने पाणीवाटप करण्याचा कार्यक्रम आखला व तो आमलातही आणला आहे. त्यामुळे माझ्या ग्रामस्थांना काही प्रमाणात का होईना पाण्याची सोय झाली आहे. तसेच कोरटी, विहाळ, पोंधवडी, सावडी या दुष्काळी गावांना मोफत पाण्याचे टँकर पुढील एप्रिल महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहे, असा मानसही सोळंकी यांनी न्यूज पीसीएमसी शी बोलताना व्यक्त केला.
















