न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च) :- मावळ लोकसभेचे पडघम वाजले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्या नावांची पक्षाकडून अधीकृत घोषणा झालेली आहे. सर्वप्रथम राष्ट्रवादीने पार्थ पवारांच्या रूपाने आपला उमेदवार मैदानात उतरवला, तर शिवसेनेने खासदार बारणे यांना मावळमधून दुसऱ्यांदा मैदानात उतरवले आहे.
मावळ तालुक्यात राष्ट्रवादीने सर्वप्रथम प्रचाराचा शुभारंभ केला. त्यामुळे त्यांचा प्रचार आघाडीवर आहे. उमेदवारही युवा असल्याने तरुणांमध्ये पार्थ पवार यांची सध्यातरी क्रेज आहे. पिंपरी चिंचवडसह मावळात त्यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली. मतदारांचे मतपरीवर्तन घडविण्यात राष्ट्रवादी आघाडीवर असताना मावळातील मिनी निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतींचा धक्कादायक निकाल लागला आहे. निवडणूक विभागाच्या वतीने सात ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली. यातील चार ग्रांमपंचायतीसाठी मतदान झाले. यात चारपैकी तीन सरपंच भाजपचे, तर एक सरपंच राष्ट्रवादीचा निवडून आलेला आहे.
त्यामुळे या मिनी निवडणुकीत भाजपचाच वरचष्मा पहावयास मिळाला. सेना-भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी युती झालेली आहे. ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कल भाजपकडे झुकलेला दिसतो. लोकसभेची निवडणूक २९ एप्रिलला होणार आहे. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादीला मावळचा गड काबीज करणे अवघड दिसत आहे. या निकालाची नांदी सध्यातरी सेना-भाजपकडे झुकल्याचे दिसते. त्यामुळे मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीला आणखी परिश्रम घ्यावे लागतील यात दुमत नसावे.











