न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२३) :- पिंपरीतील दि-सेवा विकास सहकारी बँकेचा चाचणी लेखापरीक्षण अहवाल हा एकतर्फी, पक्षपाती व नैसर्गिक न्याय तत्वांचा भंग करणारा असल्याचा ठपका ठेवत सहनिबंधकांचा १२ जून व १ जुलै २०१९ रोजीचा तपासणी अहवाल आणि ६ ऑगस्ट २०२१ रोजीचा चाचणी लेखापरीक्षण अहवाल रद्द करण्यात आले आहेत. बँकेचे सन २०१६-१७, २०१७-१८ या वर्षाचे नव्याने चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार मंत्री अतुल सावे यांनी पुणे सहकार आयुक्तांना दिले आहेत.
बँकेच्या माजी संचालिका दया मूलचंदानी यांनी बँकेच्या २०१६-१७, २०१७-१८ या वर्षाच्या चाचणी लेखापरिक्षणाच्या आदेशाविरोधात सहकार मंत्र्यांकडे अपिल दाखल केले होते. हेतू ठेवून आणि बँकेला बदनाम करण्याच्या दृष्टीने लेखापरीक्षण अहवाल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या अपिलावर सहकार मंत्र्यांनी सुनावणी घेतली. साखर आयुक्तालयातील सहनिबंधक यांच्याकडील पुरेसा कारभार विचारात घेता त्यांची लेखापरिक्षणासाठी नियुक्ती करू नये असे साखर आयुक्तांनी लेखी कळवूनही सहकार आयुक्तांनी त्यांची नेमणूक केली. त्यांनी तक्रारदाराला सोयीचा अहवाल दिला, हा आक्षेप योग्य आहे.
सहकार मंत्र्यांनी दि-सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेच्या फेर लेखा परिक्षणाचा आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. अनिल कवडे सहकार आयुक्त












