न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून अनेक प्रभावी उपाययोजना राबविल्या जात असून ९ कलमी कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आहे. त्या माध्यमातून येत्या काळात स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पिंपरी चिंचवड शहर नक्कीच पहिल्या पाच शहरांमध्ये असेल, असा विश्वास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत आयुक्त सिंह बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्वच्छ भारत अभियानाच्या समन्वयक सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार, मनोहर जावरानी, क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे, शीतल वाकडे, राजेश आगळे यांच्यासह सहाय्यक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, मुकादम, आरोग्य सहाय्यक, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच स्वच्छतेचे काम करणाऱ्या एजन्सीजचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह यांनी स्वच्छता उपक्रम तसेच केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले, २०२५ पर्यंत पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पहिल्या क्रमाकांवर नेण्याचे ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून सकारात्मक भावना वृद्धिंगत करावी. घनकचरा व्यवस्थापन करत असताना काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. कचरा संकलन करणारे वाहन एखाद्या भागात पोहोचले किंवा नाही याची खातरजमा केली पाहिजे. आपसात समन्वय ठेऊन प्रत्येकाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली पाहिजे, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिले.












