- योग हे मन आणि शरीर समृध्द करणारे महत्वाचे माध्यम – योगाचार्य गिरीश जोशी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये आज बुधवारी (दि. २१) रोजी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी साधकांकडून योग शिक्षकांनी विविध आसन, प्राणायम, ओंकार प्रात्यक्षिकांसह करवून घेतली.
यावेळी चॅलेंजर पब्लिक स्कूलचे चेअरमन संदीप काटे, सौ. अनिताताई काटे, योगाचार्य गिरीश जोशी आणि पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग हे मन आणि शरीर समृध्द करणारे महत्वाचे माध्यम आहे. योगाद्वारे शारीरिक व्याधिंच्या व्यतिरिक्त मानसिक समस्यांचेही निराकरण केले जाऊ शकते. निरंतर योगाभ्यासाने तल्लख बुद्धी, स्वस्थ हृदय, सकारात्मक भावनांची जागृती आणि शांतीसुखाने युक्त अशी जीवनशैली शक्य आहे, असे उदगार योगाचार्य गिरीश जोशी यांनी याप्रसंगी काढले.
सौ. अनिताताई काटे यांनी योगाचे महत्व आणि महिलांनी आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयांवर मार्गदर्शन केले. हा उपक्रम चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.