- ‘तलाठी’ पद खाऊ लागलायं भाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२३) :- महसूल विभागाच्या तलाठी पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवारपासून (दि. २६) सुरू झाली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यात एकूण ४ हजार ६४४ तलाठयांची पदे भरली जाणार आहे. या परीक्षेसाठी दोन दिवसातच तब्बल ३० हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
तलाठी भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यानुसार जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांनी तलाठी भरतीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली. तलाठी पद भरतीसाठी उमेदवारांना १७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अर्ज करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी चारपर्यंत ३० हजार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान अर्ज भरण्यासाठी आणखी काही दिवस असल्याने येत्या काही दिवसात संख्या वाढून काही लाखात ती जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
तलाठी पदासाठी एकूण दोनशे गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. भूमी अभिलेखच्या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. तसेच अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन भूमि अभिलेख विभागाने केले आहे.














