- सल्लागार व आर्किटेक्टची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार व आर्किटेक्ट म्हणून एयुएम टेक्नॉलॉजिक्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना स्टेडियमच्या एकूण खर्चाच्या १.९८ टक्के शुल्क दिले जाणार आहे. या कामासाठी सन २०२३ २४ च्या अंदाजपत्रकात चारशे कोटी रूपयांस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीत मंगळवारी (दि. २७) त्यास मान्यता दिली आहे.
मोशी येथील आरक्षण क्रमांक १/२०४ येथे पालिकेच्या वतीने क्रिकेट स्टेडियम उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ४०० कोटींची मान्यता घेण्यात येत आहे. स्टेडियमचे काम करण्यासाठी सल्लागार व आर्किटेक्ट नेमण्यात येणार आहे. त्यासाठी २० एप्रिल २०२३ ला निविदा प्रसिद्ध करून दर मागविण्यात आले होते.
त्यात ऐयुएम टेक्नॉलॉजिक्सची १.९९ टक्के, डोंगरे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट २ टक्के आणि व्हीकेयू अर्बनची २ टक्के दर प्राप्त झाला. ऐयुएमचा लघुत्तम दर असल्याने त्या एजन्सीची निवड करण्यात आली आहे. एजन्सीला निविदापूर्व १.९८ टक्के व निविदापश्चात ०.०१ टक्के शुल्क देण्यात येणार आहे. सल्लागार नियुक्तीस व त्यांना शुल्क देण्यास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
मोशीत स्टेडियम उभारण्यासाठी सल्लागार नेमण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली असून अंदाजे चारशे कोटी गृहीत धरण्यात आले आहे. मात्र, सल्लागार डिजाइन, एस्टीमेट केल्यानंतर रक्कम अंतिम होईल. तसेच स्टेडियम बीओटी, पीपीई, खासगी आणि पालिकेच्या निधीतून करायचे हे अद्याप निश्चित झालेले नाही.
– मकरंद निकम, शहर अभियंता…















