- महापालिका निवडणुकीत पुन्हा नगरसेवक संख्याबळ वाढणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- अजित पवारांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सामील झाला. यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या भाजप व शिंदे गटातील इच्छुकांच्याही पायाखालची वाळू सरकली. यापूर्वीही पिंपरी चिंचवडवर अजित पवार यांचे विशेष लक्ष होते. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर बसवण्यासाठी ताकद लावणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या चार वर्षांपासून राज्यातील घडामोडीनंतर विविध पक्षांच्या पदाधिका-यांनी महापालिकेत महापौर स्वतःच्या पक्षाचाच होणार असल्याचा दावा केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्येदेखील महापौर पदासाठी रस्सीखेच होणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१७ साली राष्ट्रवादीच्या ताब्यातून महापालिका घेण्यास भाजपला यश आले. त्यानंतर २०१९ मध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी पुन्हा शहरामध्ये दौरे सुरू केले होते. मात्र, जून २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर काही प्रमाणात पुन्हा अजित पवार व शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस बॅकफूटवर गेली.
राज्यामध्ये शिंदे गट आणि भाजपाचे सरकार आल्याने शहरातील भाजप व शिंदे गटातील इच्छुकांनी महापालिकेसाठी मोठी तयारी केली होती. महापालिका निवडणूक एकत्रित लढवणार असल्याने दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शहरातील जागा वाटपाचे आडाखे बांधले होते. त्यानुसार इच्छुकांनी तयारी केली. मात्र, राज्यातील सत्तेत राष्ट्रवादीच्या सहभागाने महापालिकेतील समीकरणेदेखील बदलली आहे. भाजप आणि शिंदे गटाने तीन सदस्यीय प्रभागानुसारच जागा वाटपाची तयारी केली होती.
















