न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- महावितरणच्या प्राधिकरण, निगडी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे अधिकारी व कर्मचारी वैतागले होते. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बहुजन ऊर्जा युनियनने लावून धरली होती. तक्रारींची दखल घेऊन अखेर चौधरी यांची बदली करण्यात आली आहे.
चौधरी याचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. नवीन कनेक्शनसंबंधित कामाच्या मंजुरीमध्ये अनावश्यक दिरंगाई, आर्थिक फायद्यासाठी इस्टीमेट लोड मंजुरी करण्यात टाळाटाळ करणे, अवास्तव वाढीव इस्टीमेट देवून वीजग्राहक व ठेकेदाराना त्रास देण्याचा प्रकार सर्रासपणे केला जात होता. पुरवठादाराकडून आलेले
नवीन प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात होते. परस्पर संबंधित वीज ग्राहकांना संपर्क करून मी काम करतो, अशा प्रकाराच्या अनेक तक्रारी चौधरी यांच्या विरूद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अत्यावश्यक रजा मंजुर केल्या जात नव्हत्या.
कार्यालयासमोरच चौधरी व सहायक अभियंता यांच्यात ११ ऑक्टोबर २०२१ ला हाणामारीची घटना घडली होती. त्या प्रकरणी चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी बहुजन ऊर्जा युनियनने लावून धरली होती. संघटनेच्या तक्रारीची दखल घेऊन चौधरी यांची कोल्हापूर झोनमध्ये बदली करण्यात आली आहे, असे बहुजन ऊर्जा युनियनचे सरचिटणीस शरद चव्हाण व उपाध्यक्ष फहीम शेख यांनी सांगितले.


















