- खासगीकरण हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने जलतरण तलावांचे खासगीकरण करू नये. खासगीकरण हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे देशविरोधी व संविधान विरोधी धोरण आहे. पालिकेने जलतरण तलावांचे दर नुकतेच दहा रुपयांवरून २० रुपये केले आहेत. तसेच मासिक पासचे दरही वाढवले आहेत. त्यामुळे आत्ता मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दुप्पट उत्पन्न पालिकेला मिळणार आहे. त्यामुळे खासगीकरण करण्याची काहीच गरज नाही.
प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करातून मोफत व दर्जेदार सुविधा पुरविणे स्थानिक स्वराज्य संस्था यांचे प्राथमिक व महत्वाचे कर्तव्य आहे. त्याप्रमाणेच जिम, जलतरण तलाव, विविध खेळांचे हॉल इ. सुविधा उत्पन्नाचा विचार न करता दर्जेदार व माफक दरात पुरविणे हेही स्थानिक स्वराज्य संस्थाचे महत्वाचे कर्तव्य आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पालिकेने आपल्या जलतरण तलावांचे खासगीकरण न करता स्वतःच ते चालवावेत व सुरक्षेचे सर्व उपाय करून नागरिकांना चांगली सेवा द्यावी.
तसेच जीवरक्षक नसल्याने मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे सुरक्षेची सर्व काळजी घेऊन नागरिकांना चांगल्या सेवा पालिकेने पुरवाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. सचिन गोडांबे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.














