न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२३) :- कुंडमळा धबधबा येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा पाय घसरला आणि तो वाहून गेला आहे. ओंकार गायकवाड असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तो टाटा मोटर्स या कंपनीत कामाला होता.
मावळ तालुक्यातील आंबी परिसरात ही घटना घडली आहे. यावेळी धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेत असताना अचानक ओंकारचा पाय घसरला आणि तो वाहून गेला. वाहून गेलेल्या ओंकारचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. कुंडमळा धबधब्यावर फिरायला गेल्यावर बाळगलेली निष्काळजी त्याच्या जीवावर बेतली आहे.
ओंकार हा त्याच्या मित्रांसोबत वर्षा विहारासाठी कुंडमाळ धबधबा येथे आला होता. सेल्फी काढण्यासाठी तो पाण्याच्या प्रवाहात उभा राहिला मात्र त्याचा पाय घसरला आणि तो वाहत्या पाण्यासोबत वाहून गेला. तो वाहून जाण्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच मावळ वन्यजीव रक्षक टीम, स्थानिक ग्रामस्थ आणि आंबी एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ओंकारचा शोध सुरु आहे.














