न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२३) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील निगडीजवळील सिद्धिविनायकनगरी पाणी योजनेसाठी पंधराव्या वित्त आयोगातून पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने यांनी दिली.
सिद्धिविनायकनगरी, श्री विहार, परमार कॉम्प्लेक्स आणि दत्तनगर व परिसरास अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा कॅन्टोन्मेंटच्या वतीने व्हावा, अशी स्थानिक रहिवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती.
देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी प्रवेशद्वार ते सिद्धिविनायकनगरी या पाच किलोमीटर दरम्यान जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेला पाच कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती माने यांनी दिली.
हे काम ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. ऑक्टोबर – नोव्हेंबर (२०२३) पर्यंत हे काम पूर्णत्वास जाईल. निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. हगवणेमळा, कारकेमळा आणि काळोखेमळ्याचाही पाणी प्रश्न सुटणार आहे. यासाठी ‘एमआयडीसी’च्या झेंडे मळ्यातील जलवाहिनीवरून सहा इंची व्यासाची वाहिनी टाकून, या भागासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. हे कामही लवकरच सुरू केले जाईल, असेही माने यांनी सांगितले.














