न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- कोयत्याने वार करीत, दुकान व वाहनांची तोडफोड करण्यात करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिड काढली. चिखली पोलिसांनी रूपीनगर आणि ओटास्कीम परिसरातून ही धिंड काढली.
दुकानाच्या बाहेर चप्पल काढायला सांगितल्याच्या कारणावरून शनिवारी (दि. ८) रात्री टोळक्याने दुकानातील कामगारावर कोयत्याने वार केले. तसेच दुकानावर दगडफेक केली. हातातील कोयते नाचवत आम्ही इथले भाई आहोत. कोण आमच्या नादाला लागतोय तेच पाहतोय, असे म्हणत परिसरातील पाच वाहनांची तोडफोड करीत परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून सहा आरोपींना अवघ्या काही तासांत अटक केली.
आरोपींची ही दहशत मोडीत काढण्यासाठी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी त्यांना हातात बेड्या घालून रुपीनगर आणि ओटास्कीम परिसरात धिंड काढली.














