न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२३) :- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे कार्यालय, सिटी ऑपरेटर व डिजास्टर रिकव्हरी सेंटर चिंचवड येथील वॉर्ड सेंटरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ३ कोटी ४ लाख २२ हजार खर्च केला जाणार आहे.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाची मुदत ३० जून २०२३ ला संपली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी बरखास्त न करता त्याचे कामकाज पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथील कार्यालयाचे दरमहा वीज बिलासह २ लाख रूपये इतके भाडे आहे. हे भाडे स्मार्ट सिटी केंद्र, राज्य व महापालिकेडून मिळणाऱ्या निधीतून केले जात आहे. दरमहा इतके भाडे भरणे परवडत नसल्याने महापालिकेच्या मिळकतीमध्ये कार्यालय स्थलांतर करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
त्यानुसार, चिंचवड येथील वॉर्ड सेंटरची जागा निश्चित केली आहे. तेथे स्मार्ट सिटीचे कार्यालय, सिटी ऑपरेशन, डिजास्टर रिकव्हरी सेंटर तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या विद्युत मुख्य कार्यालयाने ३ कोटी ६३ लाखांची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यासाठी ४ ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यातील ३ ठेकेदार अपात्र ठरले. तर, ग्रीनलिंक इन्फ्रा या ठेकेदाराची १६.२० टक्के कमी दराची ३ कोटी ४ लाख २२ हजार खर्चाची निविदा स्वीकृत ठरली आहे. याकामाची मुदत ८ महिने (२४० दिवस) आहे. या खर्चास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.