न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२३) :- भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील ५४५ गृहनिर्माण संस्थेमध्ये येत्या शनिवारी (दि. २२) व रविवार (दि. २३) जुलै रोजी ‘गृहनिर्माण संस्था मतदार नोंदणी अभियान’ राबविण्यात येणार आहे.
मतदार यादीत नावे नाहीत अशा पात्र मतदारांना संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनी कागदपत्रासंह मतदार नोंदणी अभियानात उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करावे. मृत व स्थलांतरित मतदारांची माहिती देखील निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी. नोंदणीसाठी अर्जासोबत रहिवासी पुरावा म्हणून विद्युत देयक, पाणीपट्टी, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार यापैकी एका तर वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्य शिक्षण मंडळाने दिलेले दहावी, बारावीचे प्रमाणपत्रे यापैकी एका पुराव्याची आवश्यकता आहे. ऑनलाइन नाव नोंदणीसाठी सर्व्हिस पोर्टल व वोटर हेल्पलाइन अॅपचा वापर करावा.
नवीन नावासाठी नमुना ६, नाव वगळण्यासाठी नमुना ७ व मतदार यादीतील नोंद संदर्भातील दुरुस्ती करिता नमुना ८ भरण्यात यावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.














