- या प्रकल्पांचा आहे समावेश; पीएमओ कार्यालयाला दिली माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२३) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या मुळा नदी सुधार प्रकल्पाचे, मोशी कचरा डेपो येथील कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एजन्सी) आणि बोयोमॉयनिंग या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्टला करण्याचे नियोजन आहे. त्या संदर्भातील माहिती पीएमओ कार्यालयास पाठविली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार प्रकल्प राबविला जात आहे. वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंत असे ८.८० किलोमीटर अंतराच्या नदी पात्राच्या एका बाजूचे काम पिंपरी-चिचवड महापालिका करीत आहे. त्यासाठी २७६ कोटी ५४ लाख खर्च आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानाच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे.
मोशी येथील कचरा डेपोमध्ये वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प उभारला आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली आहे. त्यात १.०० मेगावॅट वीज तयार केली आहे. हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर २०८ कोटी ३६ लाख रुपये खर्च करूनउभारला आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू केली डेपोत जमा झालेल्या ७०० टन सुक्या कचऱ्यापासून दररोज १४ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. ती वीज प्रतियुनिट ५ रुपये दराने पालिका २० वर्षे विकत घेणार आहे. मैला सांडपाणी शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी वापरणार आहे. त्यामुळे पालिकेच्या वीजबिलात सुमारे ३५ ते ४० टक्के बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, तयार होणारी वीज वहनासाठी महावितरणांच्या यंत्रणेसोबत सुरू असेलली प्रक्रिया अद्याप झालेली नाही. या प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन आहे.
तसेच, ८१ एकर जागेतील कचरा डेपोत गेल्या २५ वर्षांत जमा झालेल्या कचऱ्याचे मोठे मोठे डोंगर आहेत. ते काढून त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. या बायोमायनिंगच्या पहिल्या टप्प्यात १४ एकर जागेतील कचरा काढण्याचे काम मार्च २०२१ ला सुरु झाले आहे. त्यासाठी ४२ कोटी खर्च करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील आहेत. त्यांनी त्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना सूचना केल्या.
दरम्यान, पंतप्रधान मोदी हे येत्या १ ऑगस्टला विविध कार्यक्रमांसाठी पुणे शहरात येत आहेत. त्यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेने वरील तीन प्रकल्पांची माहिती पीएमओ कार्यालयास पाठविली आहे. पुणे शहरातील प्रकल्पांसह पिंपरी-चिंचवड पालिकेच्या प्रकल्पाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिका तयारी करीत आहे, असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेत बो-हाडेवाडी व चऱ्होली येथील गृहप्रकल्पांतील सदनिका तयार झाल्या आहेत. बो-हाडेवाडीचा प्रकल्प १०० टक्के तयार असून, चऱ्होलीतील ७ इमारती तयार आहेत. तेथील सदनिकांची चावी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन आहे.
–














