न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२३) :- पिंपरी-चिंचवड आगाराच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी अष्टविनायकसाठी विशेष बसची सोय करण्यात आली आहे. शहरातील वल्लभनगर आगारामधून गुरूवारी (दि. ३ ऑगस्ट) पहाटे साडेसहा वाजता ही बस सुटणार आहे.
शहरामधून अष्टविनायक दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दर महिन्याच्या चतुर्थीला आगारामधून विशेष बसची सोय करण्यात येते. यंदा जानेवारी महिन्यातील अंगारकीला आगारामधून अष्टविनायक दर्शनासाठी ८ बस सोडण्याचा विक्रम आगारामधून झाला आहे. त्याला भाविकांचा प्रतिसाद पाहता वेळेवर आगाऊ बसची देखील सोय केली जाते.
महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर आरक्षणाची सोय केली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी ओझर येथे भक्त निवासामध्ये राहण्याची सोय केली आहे. राहणे तसेच भोजनाचा खर्च भाविकांना स्वखर्चाने करावा लागणार आहे. या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी केले आहे.














