न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव वार्ताहर (दि. २८ जुलै २०२३) :- देहूतील इंद्रायणी नदीपात्रात ‘तुका आकाशा एवढा’ हे शिल्प उभारण्यासाठी देहू नगरपंचायतीने सोमवारी (दि. २४) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. यासाठी येणाऱ्या खर्चासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीचा घाट परिसर वाढविण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणेस मान्यता देण्यात आली. नगराध्यक्षा स्मिता चव्हाण सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. मुख्याधिकारी डॅा. प्रवीण निकम व नगरपंचायतचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
याबाबत मुख्याधिकारी डॅा. प्रवीण निकम यांनी सांगितले, ‘‘इंद्रायणी नदी पात्रात संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर ‘तुका आकाशा एवढा’ हे शिल्प उभारण्यासाठी इस्टिमेट तयार करण्यात येणार आहे. तसेच घाट वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे महाद्वार कमानीजवळ असलेल्या ग्रामपंचायतीच्या जागेत अस्मिता भवन उभारण्यासाठी चर्चा झाली. हनुमान मंदिरासाठी नव्याने प्रशस्त समाज मंदिर बांधण्यास मंजुरी देण्यात आली. संत तुकाराम महाराज आणि कन्या विद्यालय, सर्व प्राथमिक शाळा यांना नळ कनेक्शन नगरपंचायतीच्या वतीने देण्यास मंजुरी देण्यात आली. जुन्या पोस्ट आॅफिसच्या जागेत भव्य व्यापारी संकुल बांधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.’’














