न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२३) :- गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे शहरातील रहिवासी भागात घरे भाड्याने घेऊन राहत असल्याच्या घटना पुणे शहरात घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील घरमालकांनी भाडेकरूंचे भाडेकरार व वैयक्तिक माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे घरमालकांची पळापळ सुरू आहे. ही माहिती सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.
दिनेश यादव यांनी चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी घरमालकांना भाडेकरूंची माहिती व भाडेकरार पोलीस स्टेशनला देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरातील गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे. परंतु बहुतांश भागातील घरमालकांनी आपल्याकडे राहत असलेल्या भाडेकरूंचे भाडेकरार केलेले नाहीत. त्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे नाही. त्यामुळे कुदळवाडी परिसरामधील घरमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाडेकराबद्दल व्यवस्थित माहिती न मिळाल्याने नागरिक संभ्रम अवस्थेत आहेत. याबद्दलची व्यवस्थित माहिती देण्यासाठी पोलीस व घर मालक यांच्यामध्ये स्वतंत्रपणे एक बैठक आयोजित करावी व भाडेकरार याबद्दल व्यवस्थित माहिती देण्याची मागणी यादव यांनी केली आहे.
भाडेकरारासाठी जी कागदपत्रे आवश्यक आहेत त्याची व्यवस्थित माहिती देऊन नागरिकांमधला संभ्रम दूर करावा व लवकर घरमालक व पोलीस अधिकारी यांच्यात बैठक आयोजित करावी, अशी मागणी यादव व कुदळवाडीतील ग्रामस्थ अॅड. नितीन मोरे, उत्तम बालघरे, काका शेळके, राहुल गवारे, प्रकाश चौधरी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक काटकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.














