- तब्बल ६५ फूट भगव्या ध्वजाची गावात स्थापना..
- ध्वजाला नित्य मानवंदना देण्याचा श्री शिवप्रतिष्ठानचा संकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव वार्ताहर (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- संभाजी भिडे गुरुजींच्या ‘गाव तिथे भगवा’ या आवाहनाला साद देत सुदुंबरे गावातील तरुणांनी एकत्रित येत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत गावात ‘हिंदवी स्वराज्य ध्वजरोहना’ची मुहूर्तमेढ रोवली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून लोकवर्गणीच्या रूपाने निधीची उभारणी करून ६५ फूट भगव्या ध्वजाची स्थापना केली. यावेळी गावातून ‘हिंदवी स्वराज्य’ पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुणे जिल्हाप्रमुख संजय बाप्पू जठर, प्रा. पराशर मोने गुरुजी, शिवप्रतिष्ठान मावळ विभागाचे धारकरी अवधूत धामणक, गोरख शिंदे, अभिलाष चव्हाण, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पराशर मोने गुरुजी यांनी तरुणांना खडा पहारा देण्यासाठी एकत्र यावे, ध्वजाला नित्य मानवंदना द्यावी, असे आवाहन केले. शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी ध्वज प्रत्येक महिन्याला बदलण्याचा संकल्प केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज की जय, जय श्री राम, हर हर महादेव, भारत माता कि जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.














