- पीएमआरडीए प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका..
- दुर्घटना झाल्यावरच येणार का प्रशासनाला जाग; नागरिकांचा सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- तीर्थक्षेत्र येलवाडी ग्रामपंचायत हद्दीत १५ ते १६ अनाधिकृत होर्डिग्ज आहेत. त्यापैकी किमान पाच ते सहा होर्डिंग्ज देहूगाव ते येलवाडी आणि देहू फाटा या वर्दळ असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील किवळेमध्ये काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या कडेला असलेले होर्डिग्ज कोसळून दुर्घटना घडली होती. त्यात जीवितहानी झाली होती.
त्यामुळे येलवाडी परिसरात उभारलेले हे अनधिकृत होर्डिग्ज धोकादायक बनू पाहत आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाची देखील कोणतीही परवानगी होर्डिग्ज मालकांनी घेतलेली नाही. शिवाय ते वर्दळीच्या ठिकाणी आहेत. सुरक्षेच्या बाबतीतही खबरदारी घेतली नसल्याचे दिसत आहे. याशिवाय ग्रामपंचायतीचा देखील महसूल बुडत आहे.
दरम्यान येलवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित होर्डिग्ज मालकांना काही दिवसांपूर्वी नोटीस देवून ते काढण्यास सांगितले होते. अन्यथा ग्रामपंचायत प्रशासन होर्डिग्ज काढून त्याचे साहित्य जप्त करेल, अशी ताकीद दिली होती. परंतु, अद्यापही मालकांनी ते होर्डिंग काढलेले नाहीत. या कारवाईबाबत आता येलवाडी ग्रामपंचायत पीएमआरडीला पत्र देणार असून अनाधिकृत होर्डिग्जवर कारवाई करण्याबाबत सूचना करणार असल्याचे समजते.
येलवाडी-देहूफाटा हा वर्दळीचा भाग असून तळेगाव, चाकणहून देहुगावाकडे जाणारे-येणारे भाविक तसेच पिंपरी चिंचवड शहरातून चाकण आणि तळेगाव एमआयडीसीकडे जाणारा चाकरमानी वर्ग याच रस्त्याने ये-जा करीत असतो. त्यामुळे हा रहदारीचा मार्ग असून धोकादायक होर्डिग्जमुळे त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
येलवाडी नगरपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला अनेकांनी अतिक्रमण केले आहे. धोकादायक अनाधिकृत होर्डिग्जदेखील या गावच्या हद्दीत आहेत. याबाबत पीएमआरडीला लेखी पत्र देणार आहोत. त्यांच्या माध्यमातून एकाच वेळी अनधिकृत होर्डिंग्ज आणि अतिक्रमण विरोधी मोठी करवाई करण्यात येणार आहे.
– रंजित गाडे, सरपंच, येलवाडी ग्रामपंचायत…













