- केंद्राची मंजुरी मिळताच कामाला प्रारंभ..
- देहू-आळंदीसह लगतच्या गावात पोहोचणार पर्यटनाची गंगा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) इंद्रायणी नदीच्या दोन्ही काठावर सुमारे १८ सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात येणार आहेत. नदीला येऊन मिळणारे ओढे आणि नाल्यातून येणाऱ्या पाण्यावर त्या माध्यमातून प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे नदीपात्रात प्रक्रिया न करता थेट मिसळणारे सांडपाणी थांबणार आहे.
इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पीएमआरडीएने सुमारे पाचशे कोटी रुपयांचा सुधारणा आराखडा तयार केलेला आहे. त्याला नुकतीच राज्य सरकारकडून तत्त्वतः मंजुरी मिळालेली आहे.
इंद्रायणीचे प्रदूषण कमी करण्याच्या टप्पा १ मधील कामानंतर पूरनियंत्रण टप्पा २ आणि नदीकिनारा सुशोभिकरण आणि भाविकांसाठी घाट बांधण्याचे काम टप्पा-३ मध्ये केले जाणार आहे. त्यामुळे हा परिसर पर्यटनस्थळ म्हणूनही नावारूपाला येण्यास मदत होईल.
इंद्रायणी नदीच्या काठावरील देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांमुळे या नदीला आध्यात्मिक महत्त्व आहे. लाखो वारकऱ्यांची भावना या नदीशी जोडली गेली आहे. त्यामुळे इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यावर भर देण्यात आला आहे. नदी स्वच्छ करण्याबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित करण्यात येणार आहे. या नदीमध्ये सांडपाणीप्रक्रिया न करताच नदीत थेट सोडले जाते. ते रोखण्यावर ‘भर देण्यात येत आहे. तसेच औद्योगिक कंपन्यांतील पाणीप्रकिया न करताच नदीत जात असल्याने त्यावर नियंत्रण आणण्याचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केले जाणार आहे. त्यामुळे इंद्रायणीचे होणारे प्रदूषण रोखण्यास मदत होईल. तीन नगरपरिषद, २ नगरपंचायत, देहु कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि काही ग्रामपंचायतीच्या हद्दीतून ही नदी वाहते.
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाच्या (एनआरसीडी) अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. सुमारे पाचशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. इंद्रायणी प्रदूषण रोखणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. – राहुल महिवाल, महानगर आयुक्त, पीएमआरडीए…


















