- रुग्णालय प्रशासनाची चुप्पी घातलेय अंधश्रध्देला खतपाणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालय येथे अंधश्रध्देला खतपाणी घालण्यात येत आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना देखील या कायद्याला न जुमानता महानगरपालिकेच्या शासकीय रुग्णालयात अंधश्रद्धा पसरवण्याचे व गरीब रुग्णांना लुटण्याचे काम खुलेआम चालू आहे, हे अतिशय संतापजनक आहे.
वायसीएम रुग्णालयात तंत्र मंत्राद्वारे रुग्णांना ठीक करण्याचा दावा केला जातो. त्या बदल्यात गरीब रुग्णांकडून पैसे घेतले जातात. रुग्णालयात इतके सुरक्षारक्षक व कर्मचारी, डॉक्टर असताना या चुकीच्या प्रकाराला रोखण्याचा कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. यावरून हा सगळं प्रकार वायसीएम प्रशासनाच्या आशीर्वादाने चालू आहे की काय असा प्रश्न पडतो.
पुरोगामी महाराष्ट्रात व स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात असे चुकीचे प्रकार घडत आहे व असे करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची भीती नाही. महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह व पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीवर व त्याला पाठीशी घालणाऱ्या वायसीएम प्रशासनावर अंधश्रद्धा निर्मुलन कायद्या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी ईमेलद्वारे रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी केली आहे.















