- पालिकेच्या क्रीडा विभागाला नागरिकांचं साकडं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२३) :- नागरिकांनी जमा केलेल्या करातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा, उद्यान, रुग्णालय, जलतरण तलाव हे महापालिकेला उत्पन्न मिळवून देणारे आर्थिक स्त्रोत नाहीत. त्यामुळे जलतरण तलावाचे खासगीकरण करु नये. पालिकेने सेवा सुविधा वाढवाव्यात, अशी मागणी शहरातील ज्येष्ठ नागरिक, निवृत्त सैनिक, दिव्यांग, राष्ट्रीय व राज्य जलतरणपटू व प्रशिक्षक यांनी महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे केली आहे.
यासंदर्भात क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवाजी आढाव, शिवाजी पाटील, राजेंद्र पोतदार, शांतीलाल मापारी, राहुल गावडे, विनोद रेहमाने, महेश पवार, विजय सावंत, मनोजकुमार पवार, मोहन चौधरी, राजू चव्हाण, तन्मय ठाकूर, सुनील ननवरे, नारायण केसवड, जयंत मरळीकर, कैलास तापकीर आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय व राज्य खेळाडू, अपंग, निवृत्त सैनिक यांना पूर्वी लागू असलेली ५० टक्के पास सवलत पूर्ववत करावी. ऑनलाइन तिकीट बुकिंग हे एक दिवस अगोदर सायंकाळी पाचपर्यंतच करता येते. सध्या हंगाम नसल्याने अनेकांना आयत्यावेळी प्रवेश नाही. जागा शिल्लक असल्यास आयत्यावेळी येणाऱ्यासाठी ऑनलाइन पैसे आकारून प्रवेश दिला जावा. उन्हाळी प्रशिक्षणासाठी भाडेतत्त्वावर तलाव देण्याची प्रक्रिया सुलभ व सोयीस्कर करावी. त्याचे दर तीनपट वाढविल्याने आयोजकांना ते परवडणारे नाही. त्यातून सर्वसामान्यांची लूट होईल. सर्व तलावावर प्रशिक्षक जीवरक्षक नेमले जावेत, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील अनेक खेळाडू सायंकाळनंतर सरावासाठी पुणे व म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलातील तलाव येथे सरावास जातात. महापालिकेने शहरातील तलाव संध्याकाळी सहा ते रात्री आठ ही वेळ खेळाडूंना सराव करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे अनेक खेळाडूंना शहरातच सराव करता येईल. त्यातून अनेक खेळाडू तयार होतील, असे प्रशिक्षकांनी सांगितले.












