न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२३) :- भारताच्या चांद्रयान तीनचे दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग झाले, असे करणारा भारत हा चौथा देश तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या डुडुळगाव शैक्षणिक संकुलातील ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूलमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
साधारण १२० विद्यार्थ्यांनी स्पोर्ट युनिफॉर्ममध्ये एकत्र येऊन ISRO अक्षरे तयार करून इस्रोला व आपल्या भारतमातेला मानवंदना दिली. तसेच चांद्रयान व भारत माता यांच्या प्रतिकृती तयार करून त्यासमोर आपला राष्ट्रध्वज फडकवत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देण्यात आल्या.
संस्थेचे अध्यक्ष भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास विठोबा लांडे यांनी विद्यार्थ्यांचे व समन्वयकांचे कौतुक व अभिनंदन केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तर वाढतोच सोबतच भारत देशाबद्दल व चांद्रयानसारख्या मोहिमांबद्दल जनजागृती होत असते. या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी नेहमी व्हाव्या, अशा भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी संस्थेचे सचिव सुधीर मुंगसे, खजिनदार अजित गव्हाणे, विश्वस्त विक्रांत लांडे, प्राचार्या नीतू अरोरा, उपप्राचार्या उर्मिला जाधव, समन्वयिका कल्याणी केरळकर, अमृता विळसकर, कला शिक्षिका रजनी ठाकूर, सोनाली बांगर, प्रज्ञा चौधरी आणि सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












