- आयुक्तांचा हिरवा कंदील; अतिरिक्त आयुक्तांकडून प्रत्यक्ष जागेची पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील पिंपरीतील दोन व चिंचवड स्टेशन येथील एक अशा एकूण तीन ठिकाणी बहुमजली पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. ही व्यवस्था डिजाइन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट अॅण्ड ट्रान्सफर (डीबीएफओटी) तत्त्वावर म्हणजेच सार्वजनिक व खासगी भागीदारीद्वारे (पीपीपी) उभारली जाणार आहे. तेथील व्यापारी गाळ्याचे ३० वर्षांचे भाडे वसूल करता येईल. पार्किंग प्लांटपासून ५०० मीटरपर्यंत महापालिकेने डिमार्केशन केलेल्या रस्त्यावरील पार्किंग शुल्क वसूल करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यानुसार, पुन्हा निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास पसंती दिली जात असल्याने दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्याबरोबरच खासगी वाहनांची संख्याही वाढत आहे. पालिकेने १ जुलै २०२१ पासून शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर पे अॅण्ड पार्क योजना सुरू केली आहे. ती सध्या बंद स्थितीत आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर वाहनतळ उभारण्यात येणार आहे.
पार्किगची सुविधा तयार करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी प्रकल्प स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. पिंपरी उड्डाणपुलाखाली जुनी भाजी मंडई येथील ५ हजार ६०० चौरस मीटर जागा आणि पिंपरी उड्डाण पुलाजवळील क्रोमा शोरूमशेजारील २ हजार ४८७.१५ चौरस मीटर जागा आहे. तसेच, चिंवचड रेल्वे स्टेशनजवळील ३ हजार ९१०.५३ चौरस मीटर जागा आहे. त्या जागा पालिकेच्या ताब्यात असून, त्या तीन ठिकाणी रॅम्प / मॅकेनाईज्ड पद्धतीने बहुमजली पार्किंग सुविधा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या इमारती सार्वजनिक खासगी भागिदारी (पीपीपी) तत्त्वावर बांधण्यात येणार आहे. त्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने हा प्रकल्प रखडला आहे.
त्यामुळे या निविदेतील अटी सुधारण्यात आल्या आहेत. त्या इमारतीमध्ये काही व्यावसायिक गाळे बांधण्यास ठेकेदाराला परवानगी देण्यात येणार आहे. त्या माध्यमातून ठेकेदाराला गाळ्याचे भाडे मिळणार आहे. ते भाडे ठेकेदाराला ३० वर्षे वसूल करता येईल. पार्किंग प्लांटपासून ५०० मीटरपर्यंत रस्त्यावरील वाहनांचे शुल्क ठेकेदाराला वसूल करता येणार आहे. त्यामुळे इमारतीसह आजूबाजूच्या रस्त्यांवरील पार्किंगचे शुल्क ठेकेदाराला मिळणार आहे. या बदललेल्या अटीसह नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे.
पार्किंगची ही सुविधा पीपीपी तत्त्वावर करण्याचा निर्णय प्रकल्प स्थापत्य विभागाने घेतला आहे. या सुविधेमुळे वाहनचालकांना हक्काची पार्किंग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तेथील पे अॅण्ड पार्कमुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. या प्रस्तावाला नव्या सुधारित अटीसह आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.












