- ग्रामसभेचे व्हिडीओ – ऑडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक..
- मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींना गटविकास अधिकाऱ्यांच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- सावधान! आता कागदोपत्री ग्रामसभा दाखवून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांना बनवेगिरी करता येणार नाही. यापुढे ग्रामसभेचे व्हिडीओ – ऑडिओ रेकॉर्डिंग करून ते ‘जीएस निर्णय अॅप’वर अपलोड करावे लागणार आहे. यासंदर्भात मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींत हे अॅप कार्यान्वित होईल, असा विश्वास व्यक्त केला.
लॉगिनचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. मावळ तालुक्यात १०३ ग्रामपंचायती असून, यापैकी अनेक ठिकाणी नियमित ग्रामसभा घेऊन सामूहिक निर्णय घेतले जातात. ग्रामपंचायत ही गावचा कारभार पाहणारी स्वायत्त संस्था आहे. ग्रामसभेत सर्व गावकऱ्यांचा सहभाग अपेक्षित असतो. मात्र, ग्रामसेवकांकडून मर्जीतल्या दोन- चार सदस्यांच्या संगनमताने निर्णय घेऊन लादण्याचा प्रकार होत आहे.
या अॅपमध्ये लॉगिन करण्यासाठी ग्रामपंचायतींना ई-ग्रामस्वराज पोर्टलसाठी वापरला जाणारा यूजर आयडी व पासवर्ड वापरावा लागणार आहे, ‘जीएस निर्णय अॅप’ हे व्हायचंट ग्रामसभा पोर्टलशी जोडलेले आहे. त्यामुळे ग्रामसभांचे वेळापत्रक या पोर्टलवर भरणे बंधकारक राहणार आहे. ग्रामपंचायतींनी अपलोड केलेला व्हिडीओ अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांना असणार आहे. अपलोड केलेल्या व्हिडीओचा तिमाही अहवाल सरकारला सादर करावा लागणार आहे. या प्रकाराला चाप लावण्यासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी यांनी मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींना हे अॅप अनिवार्य केले असून, त्यावर २ ते १५ मिनिटांचा ग्रामसभेचा व्हिडीओ तसेच या सभेत घेतलेल्या निर्णयांचा सारांश ऑडिओ अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ग्रामसभांमध्ये सर्व गावक-यांचा सहभाग आणि बहुमताने निर्णय घेणे अपेक्षित आहे. आता जीएस निर्णय अॅपच्या माध्यमातून ग्रामसभांची खातरजमा केली जाईल, शासनाचा हा निर्णय गावच्या विकासासाठी फायद्याचा राहील. मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. – सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, मावळ…