न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २८ ऑगस्ट २०२३) :- इंद्रायणी वाटिका इमारतीच्या आठव्या मजल्याच्या डकमधून पडून अडीच वर्षांच्या मुलीसह वडिलांचा मृत्यू झाला. रविवारी (दि. २७) दुपारी साडेबाराच्या सुमारास देहूत ही घटना घडली.
रमेश मारुती लगड (वय ३४, रा. इंद्रायणी वाटिका, देहू, मूळगाव पिंपळसुटी, ता. शिरूर, पुणे) आणि मुलगी श्रेया (वय अडीच वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लगड कुटुंबीय दीड वर्षापासून इंद्रायणी वाटिका इमारतीत राहण्यास आहे. त्यांची स्वतःची सदनिका होती. रमेश, त्यांची पत्नी आणि मुलगी असे तिघे राहत होते. लष्कराच्या सेंट्रल ऑर्डनन्स डेपोत (सीओडी) रमेश नोकरीला होते. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास इमारतीखाली मुलीसोबत ते खेळत होते. त्यांनतर घरी आठव्या मजल्यावर गेले. मात्र, साडेबाराच्या सुमारास डकमधून रमेश व मुलगी खाली पडले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला धक्का सहन न झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.












