- पशुवैद्यकीय डॉक्टर आणि त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात गाय व बैलांमध्ये लम्पी त्वचा आजाराचा प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने गायींमध्ये या आजाराचा प्रसार होत असून हा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे व बाधीत जनावरांना वेळोवेळी उपचाराच्या सुविधा देण्याच्या अनुषंगाने पशुवैद्यकीय पथकांची नेमणूक करुन योग्य रीतीने कामकाज करण्याच्या सूचना उपआयुक्त संदिप खोत यांनी पशुवैद्यकीय विभागाला दिल्या आहेत.
शहरातील लंपी आजाराने बाधित गुरांची संख्या रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने तीन पथकांची नेमणूक केली असून प्रत्येक पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, मदतनीस आणि एक पशुधन पर्यवेक्षक असणार आहेत. या पथकांद्वारे महापालिकेच्या आठ विभागीय क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण दक्षता घेण्यात येणार आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने राज्य पशुसंवर्धन विभागाकडून गोटपाॅक्स लसीचे १००० डोस उपलब्ध करून घेतले असून आणखी डोस देण्याची मागणी ही केली आहे.
यावेळी खोत म्हणाले, सध्या “लसीकरण प्रक्रिया जलद गतीने सुरु असून ४०० गुरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. भटक्या गुरांमध्ये लंपी संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विलगीकरण कक्षांची स्थापना करण्यात येणार आहे”.
पशुवैद्यकीय विभागाने खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना लंपी आजाराबाबत त्वरित अहवाल सादर करण्याचे आवाहन केले आहे. अहवाल सादर झाल्यानंतर वेळेत उपचार सुरु करण्यात येतील. तसेच लम्पी रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तिन्ही पथकांसोबत सहयोगी खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर आणि त्यांचे संपर्क क्रमांकही देण्यात आले आहे.

वरील नमुद केलेल्या पथक १ ते पथक ३ मधील कर्मचा-यांनी लम्पी आजाराचे उपचार व लसीकरणाचे कामकाज करावे. तसेच आवश्यकतेनुसार उपचाराचे कामकाज करुन पशुवैद्यकीय अधिका-यांकडे दररोज कामकाजाचा अहवाल सादर करावा. या दरम्यान अधिकारी व कर्मचारी यांनी गैरहजर राहू नये तसेच सदर कालावधीतील रजा मंजुर केली जाणार नाही, अशा ही सूचना उप आयुक्त खोत यांनी दिल्या आहेत.












