न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- ‘मावळ बंद’ला इंदोरीसह सुदुंबरे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी व दुकानदारांनी सकाळपासून उत्स्फूर्तपणे बंद ठेवली. भाजी मंडई व फेरीवाल्यांनीही व्यवसाय बंद ठेवले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र व दवाखाने तसेच बॅंकांचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू होते. मात्र, खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आलेली होती. शिक्षकांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद शाळेत ‘बंद’चा परिणाम होऊन सुमारे ३५ टक्के विद्यार्थी गैरहजर होते. रिक्षा प्रवासी वाहतूक बंद होती. पीएमपीएल बस गाड्या चालू होत्या. पण प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात ‘बंद’मुळे रोडावली होती. सुरक्षितता व शांतता भंग होऊ नये म्हणून सहायक पोलिस निरीक्षक मनोज पांडे, प्रशांत सोरटे, अशोक आंबेकर व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.