न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- देहुगावातील माळीनगर येथे राहत्या घरात गळफास घेऊन अभियंता तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. ६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. कारण समजू शकले नाही.
नितीन चंद्रभान परदेशी (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचा भाऊ कैलास चंद्रभान परदेशी (२७, रा. माळीनगर, देहूगाव, मूळ रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिसांना माहिती दिली.
देहूरोडचे पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास परदेशी खासगी कंपनीत इंजिनिअर आहे. तो त्याच्या परिवारासह माळीनगर, देहूगाव येथे राहण्यास आहे. त्याठिकाणी त्यांचा भाऊ नितीन परदेशी हादेखील राहण्यास आला रक्षाबंधनानिमित्त कैलास यांची पत्नी आणि मुले गावी गेले होते. दिवसपाळी असल्याने कैलास बुधवारी कामावर गेले. रात्रपाळी असल्याने नितीन घरी एकटाच होता. त्यावेळी त्याने घरात गळफास घेतला. कैलास कामावरून सायंकाळी घरी आले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.