न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील पदपथावरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तात गुरुवारी सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईत नगरपंचायतीचे उपमुख्याधिकारी रामराव खरात, बांधकाम अभियंता सगप्पा गायकवाड, कर व प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे, आरोग्य व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून देहूतील श्री छत्रपती शिवाजी चौकात वाहतुकीची कोंडी होत होती. परंडवाल चौक ते प्रवेशद्वार कमान आणि प्रवेशद्वार कमान ते आंबेडकर चौकपर्यंत पथारीवाल्यांनी व स्टॉलधारकांनी, भाजीपाला विक्रेते पदपथावर अतिक्रमणे केली होती. त्यातच गावात वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थाच नसल्याने या भागात वाहने उभी करण्यास जागा मिळत नव्हती. वाहन चालक आपली वाहने ही रस्त्यावर उभी करीत होते. परिणामी वाहतूक कोंडी होत होती. मात्र याकडे प्रशासनाकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात होते.
अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये भांडणे होऊन ही तक्रार पोलिस स्टेशनपर्यंत गेली होती. याची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा परिषद शाळा या भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्णय घेऊन गेली दोन दिवस पदपथावरील अतिक्रमणे काढून घ्यावीत याची जाहीर सूचना ध्वनिप्रेक्षपकावरून दिली जात होती.
बुधवारी संध्याकाळपर्यंत विक्रेत्यांनी आपली अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने नगरपंचायतीने गुरुवार सकाळपासून अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू केली आहे. यासाठी पोलिस बंदोबस्तदेखील घेण्यात आला होता. मात्र, काही विक्रेत्यांनी ही कारवाई सणाच्या तोंडावर केल्याने नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, वाहतुकीच्या दृष्टीने ही कारवाई योग्य असल्याचे मतही काही दुकानदारांनी व वाहनचालकांनी व्यक्त केले आहे.